आरोग्य

तथागत गौतम बुद्ध सांगतात:
"शरीराचे आरोग्य उत्तम राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ व निर्मल ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञेचा दीपही प्रज्वलित राखू शकणार नाही." 

"To keep the body in good health is a duty, or otherwise you shall not be able to keep your mind strong and clear and have the lamp of wisdom burning."  
-The Buddha

चार प्रकारचे सुख

सुखी गृहस्थ- The Happy Householder
    
    एकदा अनाथपिंडक तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करुन जवळच्या आसनावर बसला. गृहस्थांचे सुख कशात आहे हे जाणून घेण्याची त्याला उत्सुकता लागली होती. म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची तथागतांना विनंती केली.

     तथागत म्हणाले, "गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे (happiness of possession). गृहस्थाजवळ धन असते. त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते."

         "दुसरे सुख उपभोगाचे (happiness of enjoyment). गृहस्थाजवळ धन असते. ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीरसामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपभोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे, या विचाराने त्याला सुख लाभते."

         "तिसरे सुख म्हणजे अन्-ऋण (happiness of freedom from debt). गृहस्थ कोणाचेही लहानमोठे ऋण लागत नाही यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेही काही ऋण लागत नाही, या व अशा विचाराने तो सुखी होतो."

         "चौथे सुख निर्दोषतेचे. काया, वाचा, मनसा निर्दोष कृत्ये करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो."

बुद्ध म्हणतात, "अनाथपिंडकामनुष्याने जर प्रयत्न केले तर खरोखर त्याला ह्या चारही प्रकारचे सुख लाभेल."

(Ref: Buddha and His Dhamma, Dr B.R.Ambedkar)

1. सारनाथ येथे आगमन




🌷1. सारनाथ येथे आगमन 🌷

Arrival at Sarnath
*************************

1) आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की, "सर्वप्रथम कुणाला धम्मोपदेश देऊ?" ("to whom shall i first teach the doctrine?") त्यांना आलारकालाम याची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. "त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर?" परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले.

2) नंतर त्यांनी उद्दक-रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला; परंतु तोही मृत्यू पावला होता.

3) त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या पाच सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्यांच्या बरोबर होते. आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते.

4) बुद्ध स्वतःशीच म्हणाले, "त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले. माझी सेवा केली. माझी खूप काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे?"

5) त्यांनी त्यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली, तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपत्तनच्या मृगदायवनात राहात आहेत (in the deer park of Isipatana). ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले.

2. बुद्धांचे पहिले प्रवचन- मध्यम मार्ग



🌷2. बुद्धांचे पहिले प्रवचन 🌷

The Buddha's First Sermon
*************************
1) परस्परांना अभिवादन करुन कुशलक्षेम विचारल्यावर त्या पाच परिव्राजकांनी बुद्धांना विचारले, "तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय?" बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले.

2) बुद्ध म्हणाले, "जीवनाची आत्यंतिक अशी दोन टोके आहेत. एक सुखोपभोगाचे (a life of pleasure) व दुसरे आत्मक्लेशाचे (a life of self-mortification).

3) "एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना (desires) मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत." हे दोन्हीही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे; म्हणून बुद्धांनी ते नाकारले.

4) बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. 'मज्जिम पतिपद' - 'मधला मार्ग' जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही.

5) बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, "माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व, मीपणा कार्यप्रवृत्त असतो आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय?" ते उत्तरले, "आपण म्हणता ते बरोबर आहे."

6) "जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करु शकत नाही; तर आत्मक्लेशाचे दरिद्री व निरुपयोगी जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल?" त्यांनी उत्तर दिले, "आपण म्हणता ते बरोबर आहे."

7) "जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल; तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्ही ऐहिक सुखोपभोगाची इच्छा धरणार नाही आणि नैसर्गिक गरजांची तृप्ती झाल्यामुळे तुमच्यात मलीन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारिरीक गरजेनुसार तुम्ही खा, प्या."

8) "सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती (pleasure-seeking) अधःपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि, माझे तुम्हाला सांगणे असे की, जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही: शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ व स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारुपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही." (To keep the body in good health is a duty, or otherwise you shall not be able to keep your mind strong and clear and have the lamp of wisdom burning.)

9) "हे परिव्राजकहो, ही गोष्ट समजून घ्यावी की, ही दोन आत्यंतिक अशी टोके (extremes) आहेत की, माणसाने त्यांचा कधीही अवलंब करु नये- एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे- तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे सतत केलेली तपश्चर्या किंवा आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे."

10) "
ही दोन्ही आत्यंतिक टोके (extremes) ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मार्गाची शिकवण देत आहे."

11) त्या पाच परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले की, "आपणाला आम्ही सोडून आल्यानंतर आपण काय काय केले?" तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यावर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हे सर्व बुद्धांनी त्यांना सांगितले.

12) हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास परिव्राजक अधीर झाले आणि ते स्पष्ट करुन सांगण्याविषयी त्यांनी बुद्धांना विनंती केली.

13) तथागत बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली.

3. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- विशुद्धी मार्ग


🌷3. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- विशुद्धी मार्ग 🌷

The Buddha's First Sermon- The Path of Purity
*************************

1) परिव्राजकांनी नंतर बुद्धांना आपला धम्म समजावून सांगण्याची विनंती केली.

2) बुद्धांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली.

3) त्यांनी प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला.

4) त्यांनी परिव्राजकांना सांगितले की, "ज्याला चांगला व्यक्ती होण्याची इच्छा आहे, त्याने 'जीवनाची तत्त्वे' म्हणून काही तत्त्वे पाळली पाहिजेत (must recognise some principles as principles of life). ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे."

5) "माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची तत्त्वे अशी आहेत:
i)  कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे
ii) चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या मालकीची कोणतीही वस्तू स्वतःची न समजणे व गैरवापर/अपहार न करणे
iii) व्यभिचार न करणे
iv) असत्य न बोलणे
v)  मादक पेय ग्रहण न करणे."

6) "माझे असे म्हणणे आहे की, प्रत्येक माणसाने ही तत्त्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मुल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की, ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करु शकेल (For every man must have a standard by which to judge whatever he does). आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे ही पाच तत्त्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहेत."