पोस्ट नं 96

📚 पोस्ट नं 96 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
🌷1. यशसची धम्मदीक्षा (ii) 🌷
Conversion of Yashas
*************************

11) तथागत म्हणाले, "महाराज, आत या. आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल." ते आत गेले आणि आपल्या पुत्राजवळ बसले. पण त्यांनी त्याला ओळखले नाही.

12) यशस आपल्याला कसा भेटला आणि प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खु कसा झाला हे तथागतांनी त्यांना सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला.

13) "बाळ यशस", पिता म्हणाला, "तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर."

14) नंतर यशसने तथागतांकडे पाहिले आणि तथागत यशसच्या पित्याला म्हणाले, "यशसने पुन्हा त्या संसारी जगात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय?"

15) आणि यशसच्या पित्याने उत्तर दिले, "जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या." यशसने भिक्खू म्हणून राहण्याचा निर्णय घेतला.

16) निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला, "तथागतांनी माझ्या घरी कुटुंबियांसमवेत भोजन करण्यास संमती द्यावी."

17) तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करुन भिक्षापात्र घेतले आणि यशसबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले.

18) तेथे पोहोचल्यानंतर यशसची आई, त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटूंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले.

19) वाराणसीतील श्रीमंत कुटूंबांतील यशसचे चार मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजित, आणि गवांपती अशी त्यांची नावे होती.

20) यशसने बुद्ध आणि त्यांचा धम्म यांचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे यशसच्या हिताचे तेच आपल्याही हिताचे आहे असे त्यांना वाटले.

21) म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले.

22) यशसने ते मान्य केले आणि तथागत बुद्धांकडे जाऊन तो म्हणाला, "कृपया तथागतांनी माझ्या चार मित्रांना आपला धम्मोपदेश करावा." तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली.

🌷☘

No comments:

Post a Comment