पोस्ट नं 95

📚 पोस्ट नं 95 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
🌷1. यशसची धम्मदीक्षा 🌷
Conversion of Yashas
*************************

1) वाराणसी नगरात "यशस" नावाचा एक श्रीमंत सरदारपुत्र राहात होता. तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता. तो आपल्या आईवडिलांना अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतःपूरही मोठे होते. तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवी.

2) काही काळ गेल्यानंतर त्या सर्व गोष्टींची त्याला शिसारी आली. "या गर्तेतून कसे बाहेर पडावे? असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय?" काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले.

3) एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. फिरता फिरता तो इसिपतन/ ऋषीपतन (Isipathana) या ठिकाणाच्या दिशेने वळला.

4) थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला, "मी कुठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरेरे! काय ही दुर्दशा! केवढे हे संकट!"

5) ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना इसिपतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यशस इसिपतनला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत बुद्ध पहाटे उठून मोकळ्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते. आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशसला बुद्धांनी पाहिले.

6) आणि त्याचा तो नैराश्याचा सूर ऐकून बुद्ध म्हणाले, "काही दुःख नाही की काही संकट नाही. ये, मी तुला मार्ग दाखवितो." आणि बुद्धांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला.

7) यशसने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरित झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो बुद्धांच्या सान्निध्यात जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले.

8 ) बुद्धांचे शब्द ऐकून, 'तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्विकार करावा' अशी यशसने तथागतांना विनंती केली.

9) नंतर बुद्धांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशसने ते मान्य केले.

10) आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले. पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी बुद्ध आणि यशस भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि त्याने तथागतांना विचारले, "तथागत, माझा मुलगा यशस याला आपण पाहिले काय?"

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷

No comments:

Post a Comment