पोस्ट नं 56

📚 पोस्ट नं 56 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग तिसरा- नव्या प्रकाशाच्या शोधात
🌷 4. वैराग्याची कसोटी (ii) 🌷
Trial of Asceticism
*************************

12) रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडावरुन पडलेल्या फळांवर तो आपली गुजराण करीत असे.

13) त्याचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडाच्या सालींचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसाचे किंवा जनावरांचे केस विणून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखांचे असत.

14) त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे; तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो हालचाल करीत असे.

15) अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करुन तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की, आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला.

16) शेवटी तो इतक्या किळसवाण्या अवस्थेला येऊन पोचला, की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर इतके साचले की, शेवटी ते आपोआप पडू लागले.

17) अरण्याच्या भयाण अशा अन्तर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयाण होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता.

18) जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्णपक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहात असे आणि दिवसा तो काळ्याकुट्ट गर्द झाडीत राहात असे.

19) परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही. आणि रात्री गुदमरवून टाकणाऱ्या गर्द झाडीत राही.

20) जळालेल्या हाडांची उशी करुन तो स्मशानात झोपे.

21) त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करु लागला.

22) ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर अत्यंत क्षीण झाले.

23) तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागे. आणि जर तो पाठीचा कणा चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते. आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता.

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - नव्या प्रकाशाच्या शोधात
५. वैराग्याचा त्याग
*********************

No comments:

Post a Comment