*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 19. राजपुत्र आणि त्याचा सेवक (iii) 🌷
(The Prince and the Servant)
***********************
30) दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले:
31) "छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. जन्माच्या फेरीत सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत हे अढळ आहे"
32) "प्रेमामुळे मी माझ्या आप्त-नातलगांना सोडले नाही, तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकांस सोडण्यास भाग पाडेल."
33) "ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून तिच्या उदरी मला जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि ती माझ्या बाबतीत आता कुठे आहे?"
34) "पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र येऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो."
35) "ढग जसे एकमेकांच्या जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो."
36) "आणि ज्याअर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करुन हे जग चालले आहे, त्याअर्थी भितीदायक असणाऱ्या संयोगकाळात हे माझे, ते माझे असे मानणे बरोबर नाही."
37) "आणि म्हणून ज्याअर्थी हे सत्य आहे त्याअर्थी हे माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करु नकोस. तू परत जा. जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये."
38) "माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तुच्या लोकांना जाऊन सांग की, सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडून द्या आणि त्याचा निर्धार ऐका."
39) स्वामी आणि सेवक यांच्यातील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले.
40) लांब व सडपातळ बोटे असलेला हात, ज्यावर स्वस्तिकाचे पवित्र चिन्ह आणि ज्यांचे तळवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याला पाठीवर थोपटले आणि आपल्या एखाद्या मित्राप्रमाणे तो त्याला म्हणाला:
41) "अश्रू ढाळू नकोस कंठका, आवर ते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल."
42) त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काषाय वस्रांना नमन केले.
43) कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला.
44) अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्रांनिशी ऋषिवनाकडे जाणाऱ्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरुन मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला.
45) छन्न पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहुंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला.
46) परतीच्या मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडखळायचा व काही वेळा जमिनीवर पडत होता, आणि अशा रीतीने जात असताना स्वामीभक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की, आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते.
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: २०. छन्न परतला
*********************
No comments:
Post a Comment