पोस्ट नं 34

📚 पोस्ट नं 34 📖
*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 19. राजपुत्र आणि त्याचा सेवक 🌷
(The Prince and the Servant)
***********************

1) कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतायला पाहिजे होते. पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अनोमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की, त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली.

2) शेवटी ते अनोमा नदीच्या तीरावर येऊन पोहचले.

3) तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला: "मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील निष्ठा स्पष्ट झाली आहे. तुझ्या माझ्यासाठीच्या आपलेपणाने व प्रेमाने तू माझे ह्रदय जिंकले आहेस."

4) "तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे."

5) "ज्यांच्याकडून आपणाला लाभ होणार आहे, त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही? पण चांगली वेळ निघून गेली की, आपली वाटणारी माणसेदेखील सहसा परक्यासारखी वागतात."

6) "कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी आधारासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतुशिवाय निःस्वार्थीपणा असे काही नसते."

7) "तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा."

8 ) "महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील."

9) "त्यांना सांग की, मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही."

10) "घर सोडून अशा रीतीने मी निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करु नये. सहवास हा कितीही दीर्घ काळ टिकला तरी काही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच."

11) "जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत?"

12) "माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निःसंशय वारसाहक्क सांगणारे लोक असतात. परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते. किंबहुना ते नसतातच."

13) "महाराजांची, माझ्या पिताजींची - सेवा -सुश्रुषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की, 'मी अवेळी निघून गेलो.' पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते."

14) "ह्या आणि अशाच शब्दात मित्रा, महाराजांना सांग आणि जेणेकरुन ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत रहा."

15) "आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की, तिच्या वात्सल्यप्रेमाला मी किती तरी अपात्र आहे. ती फार महान स्त्री आहे. तिची थोरवी शब्दात सांगता येण्यासारखी नाही."

🌷🌿🌸🌷🌸🌿🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १९. राजपुत्र आणि त्याचा सेवक (ii)
*********************

No comments:

Post a Comment