*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 18. गृहत्याग (i) 🌷
(Leaving His Home)
***********************
1) सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या धारण करण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता. त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरुढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न (Channa)याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला.
2) तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखादा नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तसे अनेक स्त्री-पुरुष यांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली.
3) आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले.
4) ते त्याच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावूक झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते.
5) काही स्त्रियांना वाटले कि तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे. कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता.
6) काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला.
7) दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निःश्वास टाकीत होत्या.
8 ) अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे एकटक केवळ पाहात राहिल्या होत्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत विस्मित व स्तब्ध होऊन त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या.
9) मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करुन घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला.
10) आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोदनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहू नये असे सिद्धार्थाला वाटत होते. कारण त्याला ठाऊक होते की दुःखवेगाने ते स्वतःला सावरुन धरु शकणार नाहीत. परंतु ते त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचले होते.
11) आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले.
12) आपल्या मातापित्यांस पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशिर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की, त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडत रडत त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले.
13) छन्न कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून इकडे येऊन उभा होता. शुद्धोदन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरुन आले आणि तो रडू लागला.
14) मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले.
15) त्याने परिव्राजकाला आवश्यक असे मुंडन करुन घेतले. त्याचा भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले.
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १८. गृहत्याग (ii)
*********************
No comments:
Post a Comment