*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 17. निरोप 🌷
(Parting Words)
***********************
1) शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृतांत सिध्दार्थ गौतम घरी परतण्यापुर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता.
2) कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले, की त्याचे मातापिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत.
3) शुद्धोदन म्हणाला: "आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो. पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही"
4) सिद्धार्थाने उत्तर दिले, "मला सुद्धा गोष्टींना असे वळण मिळेल असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तीवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती."
5) "दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की, माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही."
6) "तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरुन धरले हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यांपासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जीे काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढवून घेण्यात यशस्वी झालो."
7) शुद्धोदनाचे यामुळे समाधान झाले नाही. तो म्हणाला, "आमचे काय होणार याचा तू विचारच केला नाहीस." "पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्विकारले," सिद्धार्थाने उत्तर दिले. "शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता, याचा तर आपण विचार करा."
8 ) "पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे?" शुद्धोदन आंक्रदून म्हणाला. "सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर देशत्याग का करू नये?"
9) रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोदनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, "बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस?"
10) सिद्धार्थ म्हणाला, "आई, तू क्षत्रियांची माता आहेस हे तू आजपर्यत नाही का सांगत आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय?"
11) "नाही!" गौतमी उत्तरली, "ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस. लोकांपासून अगदी दूर, हिंस्र पशूंच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल."
12) "मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय?" सिद्धार्थाने गौतमीला विचारले.
13) याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की: "आपण सर्वजन शाक्यांचा देश सोडून कोशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कोशल देशात जाऊन राहू शकतो."
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १७. निरोपाचे शब्द (ii)
*********************
No comments:
Post a Comment