

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग दुसरा - वैशालीचा निरोप
Part II- Leaving Vesali
*************************


Arrival at Kushinara
*************************
1) तथागत बुद्ध रस्ता चालून गेले, तोच त्यांना विश्रांतीची आवश्यकता भासू लागली.
2) मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले, "आनंदा, वस्त्राची घडी करुन माझ्याकरिता बिछाईत कर. मी थकलो आहे. काही काळ विश्रांतीची मला गरज आहे."
3) "जशी आपली आज्ञा," आनंद म्हणाला. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करुन बिछाईत तयार केली.
4) तथागत बुद्ध त्यावर आसनस्थ झाले.
5) आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले, "आनंदा, थोडे पाणी आण. तहान लागली आहे. पाणी प्यावे म्हणतो."
6) आनंद म्हणाला, "ककुत्थ नदी इथून जवळच आहे. तिचे पाणी स्वच्छ, चविष्ट, शीतल आणि पारदर्शक आहे. प्रवाहात उतरणेही सुलभ व आल्हाददायक आहे. तथागतांनी तेथे चलावे. म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल. ह्या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही, अस्वच्छ आहे."
7) तथागतांचा देह इतका दुर्बल झाला होता की, ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते. जवळपासचे पाणी त्यांनी आणायला सांगितले.
8). आनंदाने पाणी आणले आणि तथागतांनी ते प्राशन केले. जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मानले.
9) थोडा वेळ विश्रांती घेऊन तथागत बुद्ध भिक्खूंसह ककुत्थ नदीकडे गेले. तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जलप्राशन केले. दुसऱ्या तीरावरुन ते बाहेर आले. आणि आम्रवनाकडे त्यांनी प्रयाण केले.
10) तिथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरण्यास पुन्हा सांगितले. "मी थकलो आहे. जरा पडावे असे वाटते." त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाईत करण्यात आली आणि तथागत त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले.
11) काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तथागत उठून बसले आणि आनंदाला म्हणाले, "आनंदा! आपण मल्लांच्या शालवनात जाऊया. हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशिनारात ते उपवन आहे."
12) आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व दोन शालवृक्षांच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चौघडीची बिछाईत घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले, "मी थकलो आहे. इथे पडावेसे वाटते."
13) आनंदाने बिछाईत तयार केली आणि तथागत बुद्ध त्यावर जाऊन पहुडले.








सातवा खंड, भाग दुसरा समाप्त








*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*भाग तिसरा- महापरिनिर्वाण*
*१. वारसाची नियुक्ती*
*************************
No comments:
Post a Comment