पोस्ट नं 274

📚 पोस्ट नं 274 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग दुसरा- बुद्धांचे विरोधक व शत्रू
Part II- His Enemies
*************************
🌷6. देवदत्त: चुलत भाऊ आणि शत्रू 🌷
Devadatta, a Cousin and an Enemy
*************************

1) देवदत्त हा तथागत बुद्धांचा चुलत भाऊ होता. पण प्रथमपासूनच तो तथागत बुद्धांचा द्वेष करीत असे आणि त्याला त्यांच्याबद्दल तीव्र घृणा वाटत असे.

2) तथागत बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न त्याने केला.

3) एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असताना दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेषाने तिच्या शयनागारात त्याने प्रवेश केला. यथोधरेने विचारले, "श्रमणा, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय?"

4) "तुझा स्वामी! त्याला काय तुझी पर्वा! तुला ह्या सुखनिवासात निर्दयपणे एकटी टाकून तो निघून गेला."

5) "पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी हे केले," यशोधरेने उत्तर दिले.

6) "ते काहीही असो. पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे."

7) "श्रमण, गप्प बस. तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेत."

8) "यशोधरे! तू मला ओळखले नाहीस? मी तुझा प्रियकर देवदत्त."

9) "देवदत्त, तू फसवा आणि दुष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी श्रमण झाला तरी वाईटच होशील असे मला वाटत होते. पण तू इतका अधम वृत्तीचा असशील असा मात्र संशय आला नव्हता."

10) "यशोधरे, यशोधरे. माझे तुझ्यावर प्रेम आहे." देवदत्ताने विनवणी केली. "आणि गौतम तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दुष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे."

11) यशोधरेच्या फिकट आणि कृश चेहऱ्यावर रक्तिम्याची छटा आली. तिच्या गालावर अश्रू ओघळू लागले.

12) "देवदत्त, तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहेस. तुझे प्रेम जरी निःसीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस."

13) "जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्क, शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. तू दुष्ट भ्याड पुरुष आहेस."

14) आणि ती ओरडली, "देवदत्त, चालता हो इथून. आणि देवदत्त तिथून निघून गेला."

15) आपल्याला संघप्रमुख न करता सारिपुत्त आणि मोग्गलायनांना ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा तथागत बुद्धांवर रोष होता. देवदत्ताने तथागत बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले. पण तो एकदाही यशस्वी झाला नाही.

16) एकदा तथागत गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा करीत होते.
17) देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला. पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले.

18) देवदत्ताने बुद्धांचे प्राण घेण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न केला.

19) ह्या वेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, "मला थोडे लोक दे." अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली, "देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा."

20) मग देवदत्ताने एकास आज्ञा केली, "जा मित्रा, श्रमण गौतम अमुक जागी आहेत. त्यांची हत्या कर." मात्र तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, "मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे."

21) त्याने तथागतांचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला.

22) ह्या समयी राजगृहात नालागिरी नावाचा क्रूर नरघातक हत्ती होता.

23) देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला. रक्षकांना म्हणाला. "मी राजाचा नातेवाईक आहे. आणि मी कुठल्याही नीचपदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो."
24) "तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या रस्यावर येतील तेव्हा नालागिरीला मुक्त करा आणि रस्त्यावर जाऊ द्या."

25) देवदत्ताने तथागत बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धरांची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नालागिरी हत्तीला त्यांच्या मार्गात मोकळे सोडले होते.

26) पण तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणूका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या.

27) उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते. पण ते फार काळ टिकू शकले नाहीत. नालागिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला.

28) आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगधदेश सोडून कोशलदेशात गेला. राजा प्रसेनजित आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती. पण प्रसेनजितने त्याला तुच्छतेने वागणूक दिली आणि त्याला हाकलून दिले.

**********************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
ब्राम्हण आणि तथागत बुद्ध
*७. ब्राम्हण आणि तथागत बुद्ध*
*************************

No comments:

Post a Comment