
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर



*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- बुद्धांची प्रवचने
Part IV- His Sermons
*************************
V (पाच)- बुद्धांची धम्मावरील प्रवचने
SECTION FIVE-- Sermons on Dhamma


Prayers and Invocations to God are a Futility
***********************
1) एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले,
2) "ही अचिरवती नदी पुराने दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैलतीरावर काही काम आहे तो येथे आला आणि जर त्याला पलीकडे जावयाचे असले."
3) "आणि तो ह्या काठावर उभा राहून पैलतीराला उद्देशून बोलू लागला, "हे पैलतीरा, इकडे ह्या बाजूला ये."
4) "तर हे वसिष्ठा, अचिरवतीचे पैलतीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, आणि स्तुती करण्याने त्याच्या जवळ येईल काय ?'
5) "त्याप्रमाणेच हे वसिष्ठा, तीन वेदांत पारंगत असलेले ब्राम्हण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राम्हणत्वाला पावतो, त्या गुणांचे परिपालन करणे सोडून उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राम्हण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की:
6) "इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत; ब्रम्हा, आम्ही तुला आवाहन करीत आहोत; ईशान तुला आम्ही आवाहन करीत आहोत; प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत."
7) "तर वसिष्ठा, हे ब्राम्हण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूत्तर ब्रम्हाबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही."












It is Not What You Eat that Makes You Holy
1) एकदा एक ब्राम्हण तथागतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला.
2) तो ब्राम्हण म्हणाला, "ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. आणि 'मृतमांस' खाणे हे वाईट आहे."
3) यावर भगवंतांनी उत्तर दिले, "तू म्हणतोस की, आपण पक्षाच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृतमांसाला स्पर्श करीत नाही. तर मग तू मृतमांसाची व्याख्या कशी करतोस?"
4) "हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत; मांस भोजन नव्हे."
5) "कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वखवख, अस्वच्छ जीवन, पर-मत असहिष्णुता ही सर्व मृत-मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत."
6) "कोणाचीही त्याच्या मागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, कृपणता ही मृत-मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत."
7) "राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत-मांस भोजने आहेत. मांस भोजने नव्हेत."
8). "नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लांडीलबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे ही मृत-मांस भोजनेच आहेत. मांसभोजने नव्हेत."
9) "हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध यांमुळे शेवटी माणसाचे जीवन नरक होते. ते सर्व मृत-मांस भोजनेच आहेत. मांस भोजने नव्हेत."
10) "शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव, असा माणूस मांसमत्स्यसेवनापासून परावृत्त झाला, वस्त्राचा त्याग करुन दिगंबर अवस्थेत राहू लागला, शिरावर जटामुकुट वाढवू लागला किंवा शिरोमुंडण करू लागला, वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला, तीर्थात निम्मज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला- तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही."
11) "आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा, आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवितो, त्याने काहीही ऐकले-पाहिले तरी त्याला दोष लागत नाही."
12) "भगवन्तांची ही अत्यंत उपयुक्त सत्य शिकवण, मृतमांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण, आणि दुःखनिरोधाची शिकवण ऐकून तो ब्राम्हण भगवंतांपुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली."










**********************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*५. अधोगतीचे कारण दुष्कर्मे, अन्न नव्हे*
*************************
No comments:
Post a Comment