पोस्ट नं 214

📚 पोस्ट नं 214 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग तिसरा- बौद्ध जीवनमार्ग
Part III- Buddhist Way of Life
2. लोभ आणि तृष्णा
3. क्लेश आणि द्वेष
*************************
🌷2. लोभ आणि तृष्णा 🌷
On Craving and Lust
*************************

1) *लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका.*

2) *त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे.*

3) धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना (desire) शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की, कामना ही अशक्य व दुःखकर आहे.

4) जो स्वर्गीय कामभोगातही आनंद मानीत नाही, जो तृष्णेचा क्षय करण्यात आनंद मानतो, तो सम्यक सम्बुद्धाचा शिष्य होय.

5) लोभातून दुःख उत्पन्न होते. लोभातून भय निर्माण होते; लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते.

6) तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांपासून मुक्तता लाभते.

7) जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो (grasping at pleasure) आणि अहंकारी बनतो तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्यांचा द्वेष करू लागतो.

8). जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अति-प्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही त्यांना कोणतीच बंधने नसतात.

9) सुखोपभोगापासून (pleasure) दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही त्याच्या वाट्याला भय आणि दुःख येत नाही.

10) आसक्तीमुळे (attachment) दुःख आणि भय ही उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे. त्याला दुःख नाही, भय नाही.

11) कामुकतेपासून (lust) दुःख (grief) उत्पन्न होते. कामुकतेपासून भय (fear) उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही.

12) लोभापासून (greed) दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला दुःख नाही, भय नाही.

13) जो शीलवान व प्रज्ञावान आहे (possesses virtue and intelligence), जो न्यायी आणि सत्यवादी आहे, जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे अशा व्यक्तीवर लोक प्रेम करतात.

14). पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या माणसाचे आप्त, मित्र आणि हितैषी स्वागत करतात.

15) त्याचप्रमाणे या जगातून गेल्यानंतर त्याचे सत्कर्म आप्तेष्टांप्रमाणे त्यांचे स्वागत करते. (In like manner his good works receive him who has done good, and has gone from this world, as kinsmen receive a friend on his return)

☘☘☘☘☘
*************************
🌹 *3) क्लेश आणि द्वेष* 🌹
On hurt and ill-will
*************************
1) *कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेषभावना बाळगू नका.*

2) *हा बौद्ध जीवनमार्ग आहे.*

3) ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देत नाही, त्याप्रमाणे लोकांना आपली निंदा करायला संधी देत नाही असा या जगात दोषरहित मानव कोण आहे?

4) श्रद्धा व विश्वास(confidence), शील(virtue), वीर्य, उत्साह (energy), समाधी (meditation) सत्यशोध, ज्ञान आणि आचरण यांची पूर्तता आणि जागरूकता यांच्या योगाने गहन दुःखाचा अंत करा.

5) क्षमा परमतप आहे. निर्वाण परमपद आहे (most excellent of all is Nibbana), असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रव्रजित हा खरा तपस्वी होऊ शकत नाही.

6) निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षांच्या नियमांचे पालन करणे (to practice restraint in conformity with discipline) हा बुद्धांचा उपदेश आहे.

7) स्वत: हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांना सहाय्यही करू नका.

8). जो स्वत: सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणेच जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही त्याला सुख प्राप्त होईल.

9) विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे शांत आहे त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे.

10) जो निष्पाप व निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो त्याच्यावर लवकरच दुःख करण्याची पाळी येते.

11) जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय.

12) चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाचा लज्जेने संयम करणारा असा या जगात कोणी मानव आहे काय?

13) जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावर येऊन पडते त्याप्रमाणेच त्या माणसाला स्वतःच त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो.

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*क्रोध आणि वैर*
*************************

No comments:

Post a Comment