

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग चार- धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत
Section IV
Dhamma to be Saddhamma must Pull Down all Social Barriers


Dhamma to be Saddhamma must Break Down Barriers Between Man and Man
*************************
36) एकदा येसुकारी हा ब्राम्हण भगवान बुद्धांजवळ तीन प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला.
37) त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे, कर्माची शाश्वत विभागणी. ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, "मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राम्हण म्हणतात, ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे, ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत."
38) "हे तथागता, सेवा ही चार वर्णांत विभागली आहे. ब्राम्हणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शुद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार?"
39) भगवान बुद्धांनी त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले, "ब्राम्हणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का?"
40) "माझ्यासंबंधी विचारशील तर मी सेवा (service) करायची किंवा न करावयाची यांपैकी कशाचाच आग्रह धरत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी."
41) "क्षत्रियाचे, ब्राम्हणाचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्त्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो, ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे."
42) येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, "माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कूळ यावरून कां ठरवू नये?"
43) या प्रश्नाला भगवान बुद्धांनी उत्तर दिले, "वंशपरंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो लाकडाचा अग्नी आहे की, ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की, शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धान्त हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो."
44) "कुळावरुन माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप, स्वभाव व संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की, थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी, अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की, जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो की, कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही."
45) येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा.
46) येसुकारी तथागतांना म्हणाला, "ब्राम्हण उपजीविकेच्या साधनांचे चार प्रकार मानतात. दानापासून ब्राम्हणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची, आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्राची. जर या चारांपैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतामाचे मत काय आहे?"
47) "ब्राम्हणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय?" बुद्धांनी विचारले.
48) येसुकारीने उत्तर दिले, "नाही."
49) वसिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, *"उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे."*
("What is important is high ideals and not noble birth.")
50) "जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभावच नकोत. सर्व सारखेच आहेत." असा तथागतांचा उपदेश होता.
51) "जसे दुसरे तसाच मी. जसे आम्ही तसेच दुसरे!" हा भगवान बुद्धांचा उपदेश होता.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी माणसाची योग्यता त्याच्या जन्मावरुन नाही तर कार्यावरुन ठरविण्याची शिकवण धम्माने दिली पाहिजे
*************************
No comments:
Post a Comment