*"बुध्द आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 9. पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना 🌷
( Father's Plans to Save His Son )
*********************
1) आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने गृहस्थ जीवनात प्रवेश केलेला आहे, हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असितमुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती.
2) ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैषयिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला.
3) हा उद्देश दृष्टीपुढे ठेऊन शुद्धोदनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन आलिशान राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते.
4) प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते.
5) आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदयीन याच्याशी सल्लामसलत करुन राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतःपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला.
6) शुद्धोदन राजाने मग उदयीनास सांगितले की, त्याने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करुन घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला द्यावा.
7) अंतःपुरातील स्रियांना एकत्रित करुन उदयीनाने त्यांनी राजकुमाराचे मन कसे जिंकून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली.
8 ) त्यांना उद्देशून तो म्हणाला, "तुम्ही या प्रकारच्या सर्व कलांत कुशल आहात. तुम्ही ही भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कसबात वाकबगार आहात."
9) "तुमच्या या कलागुणांनी तुम्ही, ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांनासुद्धा विचलित करु शकता. आणि स्वर्गीय अप्सराच ज्यांना भुलवू शकतात अशा देवांनाही तुम्ही मोहवू शकता."
10) "ह्रदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करु शकता तर मग पुरूषांना तुम्ही किती सहज अंकित कराल."
11) "आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्ही, राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेमरज्जूनी बांधून त्याला तुमचा अंकित करुन ठेवणे तुम्हाला असाध्य नाही."
12) "या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल पण तुम्हाला ती शोभणार नाही."
13) "निःसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे! परंतु तुम्हाला त्याचे काय? स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षा मोठे आहे! हाच तुमचा दृढनिश्चय असू द्या."
14) "प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवतीने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते."
15) "आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षे जंगलात आपला बंदी करुन ठेविला होता."
16) "यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केले तेथे कोमल राजकुमाराची काय कथा?"
17) "हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंशपरंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही."
18) "सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात. परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात."
☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुध्द आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १०. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश
*********************
No comments:
Post a Comment