पोस्ट नं 140

📚 पोस्ट नं 140 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
Conversion of the Fallen and the Criminals
🌷2. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा (ii)🌷
Conversion of Angulimala, the Robber
*************************

10) दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, "अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही (The good in you is not yet dead). जर तुझ्यातील चांगुलपणाला तू संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल."

11) भगवंतांच्या शब्दांनी भारावून जाऊन तो म्हणाला, *"अरेरे, या ऋषीने माझा माग काढलाच."*

12) त्याने उत्तर दिले, "आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगता आहात म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे."

13) स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंतांचे पाय धरून संघप्रवेशाची इच्छा व्यक्त केली.

14) देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, "हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये." आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला.

15) आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन तथागत श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे निघाले.

--त्याचवेळी *राजा पसेनदीच्या* अन्तःप्रासादाच्या दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि, "आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करीत आहे, जखमी करीत आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, त्याचा निःपात करा," असे तो लोकांचा जमाव ओरडत होता. पसेनजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले; पण त्यात त्यांना यश आले नाही.

16) एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारले, "राजा, काय झाले? मगधाच्या सेनीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय?"

17) "नाही भगवन्; तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल या नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुडगूस घातला असून तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निःपात करावयाचा आहे; पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे."

18) "राजा, मुंडन केलेला काषायवस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारीत नाही, जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील?"

19) "भगवन, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन, किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षितेची व्यवस्था करीन. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय?"

20) त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, "राजा, हा पहा अंगुलीमाल!"

21) हे ऐकताच राजा भयाने निःशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केस न् केस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, "भिऊ नकोस, राजा. या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही."

**********************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा (iii)
*********************

No comments:

Post a Comment