

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home


Last attempt to make Him a Householder
*************************
1) आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोदन खूप रडला.
2) नंतर शुद्धोदनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित याच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले.
3) राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धास वाटेतच गाठले.
4) त्यांनी त्यांस यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळविल्यावर ते त्यांच्याजवळ बसले.
5) झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला:
6) "राजकुमार, आपला वियोगरुपी बाण ह्रदयांत रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अश्रूंचा पूर वाहात आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर विचार करा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल."
7) "आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की, आपला हा संकल्प बदलणारा नाही. परंतु आपण ही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला मला अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत."
8) "आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता, म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा."
9) "काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपभोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानप्रस्थास जाऊ शकालच. आपल्या दुःखी नातलगांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणिमात्राविषयी करुणा हाच धर्म आहे"
10) "धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साधुपुरुषांना मोक्षसाधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि श्रमणवेष ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत."
11) "आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनांच्या लाटांनी भरलेल्या खोल दुःखसागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे."
12) "जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकांत अजून प्रवेश केला नाही, अशा त्या राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गाईप्रमाणे ती सतत शोक करीत आहे. तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय?"
13) "नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तिणीप्रमाणे, पती जीवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी-कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने निश्चित संतुष्ट केले पाहिजे."
14) पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षांत घेणा-या तथागतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढीलप्रमाणे उत्तर दिले:
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
५. भगवान बुद्धांचे उत्तर
*************************
No comments:
Post a Comment