

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग चवथा- घरचे निमंत्रण
Call from Home


Suddhodana and the Last Look
*************************
14) आणि भगवंत म्हणाले, "राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निब्बाण यांचा प्रणेता आपल्या ह्रदयात प्रवेश करील."
15) आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोदनाला खूप आनंद झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला, "हे अद्भुत परिवर्तन आहे! दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे ह्रदय दुःखाने जड झाले होते; पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखावयास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील."
16) शुद्धोदन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले.
17) दुसऱ्या दिवशी सकाळी तथागत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले.
18) त्या वेळी पुढील बातमी पसरली: "ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चीवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे!"
19) ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोदन घाईघाईने गेला व तथागतांना म्हणाला, "तू माझ्या नावाला असा काळिमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय?"
20) तथागत उत्तरले, "ही माझ्या संघाची प्रथा आहे."
21) "पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस."
22). "होय, पिताजी," बुद्ध म्हणाले, "आपण राजांचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे; परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत."
23) शुद्धोदन निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, "जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नांची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या ह्या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या."
24) तथागत पित्याला पुढे म्हणाले, "जर आपण आपल्या सुख-स्वप्नांतून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सतधम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल."
25) शुद्धोदनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, "बाळ! तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन."







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. यशोधरा व राहुल यांची भेट
*************************
No comments:
Post a Comment