पोस्ट नं 109

📚 पोस्ट नं 109 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
🌷7. जीवकाची धम्मदीक्षा 🌷
Conversion of Jeevaka
*************************

1) जीवक हा राजगृहातील अंतःपुरातील स्त्री शालवती हिचा मुलगा होता.

2) अनौरस असल्यामुळे जन्मल्याबरोबरच ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते.

3) त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ खूप लोक जमून त्या मुलाकडे पाहात उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, "मूल जिवंत आहे."

4) म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले.

5) जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची पात्रता आपण मिळवावी अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.

6) म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तेथे सात वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. (studied medicine for seven years.)

7) राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमविले आणि किर्ती मिळवली.

8) साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार कार्षापण, एक गडी, एक मोलकरीण आणि एक घोडागाडी इतका मोबदला मिळाला.

9) त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली.

10) राजगृह येथे त्याने बिंबीसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले; आणि त्यासाठी बिंबीसाराच्या पाचशे राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षिस म्हणून मिळाले असे सांगतात.

11) जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची शस्त्रक्रिया (operation of trepanning) आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील (chronic intestinal trouble) उपचार हे होत.

12) राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती.

13) परंतु जीवकाचा भगवान बुद्धांकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो तथागतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे.

14) तो भगवंताचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून तथागतांनी त्याला भिक्खूची दिक्षा दिली नाही.

15) बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला; आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला तथागतांकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला.

********************
For English: see the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
८. रट्ठपालाची धम्मदीक्षा
*********************

No comments:

Post a Comment