*"बुध्द आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले" ...(continue)
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 6. बालपण आणि शिक्षण 🌷
( Childhood and Education )
*********************
1) जेव्हा सिध्दार्थ चालू आणि बोलू लागला, तेव्हा शाक्यांतील ज्येष्ठ जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, मुलाला 'अभया' या ग्राम देवतेच्या देवळात नेले पाहिजे. (village goddess Abhya)
2) शुद्धोदन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालून तयार करण्यास महाप्रजापतीला सांगितले.
3) ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेत आहे हे आपल्या मावशीला विचारले. जेव्हा त्याला समजले की, आपल्याला देवळात नेले जात आहे, तेव्हा तो हळूच हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला.
4) वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या शिक्षणास सुरुवात झाली.
5) महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोदनाने ज्या आठ ब्राह्यणांना बोलविले होते व ज्यांनी सिध्दार्थाचे भविष्य कथन केले होते तेच त्याचे प्रारंभीचे गुरु होते.
6) त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोदनाने उदिच्च (Uddikka) देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्बमित्ताला बोलावून घेतले. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र (philologist and grammarian), वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होत. शुद्धोदनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक (पाणी) सोडून, सिध्दार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा शिक्षक.
7) त्याच्या हाताखाली गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे (philosophic systems) आत्मसात केली.
8) याशिवाय त्याने आलारकालामाचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणेची विद्या संपादिली (science of concentration and meditation). भारद्वाजाचा आश्रम कपिलवत्सू येथे होता.
☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुध्द आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: ७. सुरुवातीची लक्षणे
*********************
No comments:
Post a Comment